Antyodaya Anna Yojana : राज्यभरातील दिव्यांग नागरिकांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. अंत्योदय योजनेचा इष्टांक संपला, तर प्राधान्य कुटुंब योजनेतून दिव्यांग बांधवांना अन्न धान्य देण्यात यावेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीमध्ये अन्न धान्यापासून दिव्यांग वंचित राहणार नाही, असे नियोजन करण्याचे निर्देश देखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
जनतेला रास्त भाव दुकानांमधून वेळेत शिधा उपलब्ध करुन देण्याची दक्षता विभागाने घ्यावी. शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून गरजूंना सहाय्य होत असून, सर्व शिवभोजन केंद्र सुरळीतरित्या सुरु असण्याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. जे शिवभोजन केंद्र मुदतीत सुरु झाले नाहीत, याबाबत कालमर्यादेत माहिती मागवून अद्याप सुरु झालेले नाहीत, अशी केंद्रे रद्द करावीत. शिवभोजन केंद्रांची देय असलेली देयके वेळेत द्यावीत. राज्यातील जनतेला अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून अधिक तत्परतेने गुणवत्तापूर्ण सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने विभागाचे संगणकीकरण करून अधिक पारदर्शकता आणावी, अशा सूचना मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी दिल्या.
राज्यातील तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन संदर्भात मोठा निर्णय पहा
अन्न नागरी पुरवठा विभागाच्या गोदामांची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून आवश्यकतेनुसार अर्थसहाय्य मिळण्यासाठी विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
वैधमापन विभागाचा आढावा घेऊन सर्व ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ, पूरक साधनसामग्री, वाहन व्यवस्था ठेवण्याचे सूचीत केले. वाहन काट्यांप्रमाणे (वे ब्रीज) प्रमाणे पेट्रोल पंप तपासणीसाठी सुध्दा SOP (प्रमाणित संचालन कार्यप्रणाली) बनवून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी दिल्या. बैठकीस सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.