Divyang Edu News : दिव्यांगांच्या उच्च शिक्षणासाठी मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेचे न्यू व्हीजन (New Vision) कला वाणिज्य महाविद्यालय हे देशातील पहिले निवासी अंध - अपंग महाविद्यालय आहे. महाविद्यालयास अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
$ads={1}
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेले हे महाविद्यालय 'मळगंगा अंध-अपंग सेवा संस्था' मार्फत चालविले जाते. दिव्यांगांना उच्च शिक्षण देण्यासाठी हे महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. या महाविद्यालयास अनुदान मिळण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत पाठपुरावा करण्यात येईल. या महाविद्यालयास अनुदान देण्यासाठी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच दिव्यांग बांधवांच्या उच्च शिक्षणातील अडचणी आणि त्यावर उपाययोजना याबाबत धोरण तयार करण्यासाठी समिती गठित करण्यात येईल,असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली न्यू व्हीजन कला वाणिज्य महाविद्यालयास अनुदान मिळण्याबाबतची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेचे अध्यक्ष जाई उत्तम खामकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.