Contractual Employee Regularization Latest News : राज्यातील आदिवासी विकास विभागातील रोजंदारीवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गेल्या दहा ते बारा वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आले असून, या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत नियमित करण्यात आले आहे, आता याच विभागातील उर्वरित रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात येणार असल्याची घोषणा आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित (Vijayakumar Gavit) यांनी विधानपरिषदेत केली आहे. या निर्णयामुळे 700 ते 800 रोजंदारी कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.
$ads={1}
राज्यातील 10 वर्ष पूर्ण झालेले कंत्राटी कर्मचारी झाले नियमित
राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी तत्त्वावर कार्यरत 10 वर्षांहून अधिक सेवा बजावलेल्या वर्ग-३ व वर्ग-४ मधील कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याबाबत कर्मचाऱ्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू होता.
शासकीय सेवेत कायमच्या प्रमुख मागणीसाठी अनेकदा मोर्चा, आंदोलने तसेच निदर्शने करण्यात आली. मा. न्यायालयात देखील प्रकरण दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने या कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबतचे आदेश दिल्यानंतरही त्यांचा कायम सेवेसाठीचा लढा सुरूच होता.
राज्यातील ६४५ कर्मचारी शासन सेवेत नियमित
एप्रिलमध्ये आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या १० वर्षांहून अधिक सेवा बजावलेल्या वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचाऱ्यांना ६ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार सेवेत नियमित करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयांमुळे राज्यातील ६४५ कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात आले; परंतु ज्या कर्मचाऱ्यांची अखंडपणे १० वर्ष रोजंदारी कर्मचारी म्हणून सेवा झाली त्यांनाच नियुक्तीपत्रे देण्यात आली. ज्यांची सेवा दहा वर्षांपेक्षा कमी आणि सलग दहा वर्ष झालेली नाही असे कर्मचारी वंचित आहेत. त्यांना नोकरीची प्रतीक्षा होती.
अखेर लढ्याला यश : राज्यातील ७०० कर्मचाऱ्यांना होणार लाभ!
ज्या कर्मचाऱ्यांची सेवा दहा ते बारा वर्षे झाली; परंतु ती सलग नसल्याने त्यांना अद्यापही सेवेत घेण्यात आलेले नव्हते. यासाठी या कर्मचाऱ्यांचा देखील लढा सुरू होता. आता या कर्मचाऱ्यांना देखील न्याय मिळणार असून, ज्यांची सेवा १० वर्षे झालेली आहे अशा रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांची सेवा दहा वर्षांची होणार आहे त्यांनादेखील सेवेत कायम करण्यात येणार आहे.